राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 11 नोव्हेंबर रोजी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण


मुंबई | निकाल लागून 15 दिवस उलटून गेले आहेत तरीदेखील महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा तिढा आणखी सुटला नाहीये. आज राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला निमंत्रण दिलं आहे. भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आणि आवश्यक बहुमत सिद्ध करण्यासाठी निमंत्रण दिलंय.


राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी पत्र पाठवलं आहे. पाठवलेल्या पत्रावर उद्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 11 नोव्हेंबर रोजी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिलं आहे. तेराव्या विधानसभेची मुदत संपल्याने राज्यपालांना तसं करणं गरजेचं होतं.


दरम्यान, पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाला 105 जागा, शिवसेना 56 जागा, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण मिळालं असलं तरी बहुमत सिद्ध करणं हे भाजप पुढचं सर्वांत मोठं आव्हान असणार आहे.